spot_img
spot_img
spot_img

आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परत

शबनम न्यूज | चिंचवड

रहाटणी येथील वर्धमान हाइट्स सोसायटीमधील एकाच कुटुंबातील १४ जण श्रीनगर येथे अडकले होते. स्थानिक परिस्थिती व तिकीट उपलब्धतेच्या अडचणींमुळे ते अत्यंत चिंतेत होते. या संकटात त्यांना आधार मिळाला तो म्हणजे पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या सर्वांना श्रीनगर ते पुणे या प्रवासासाठी हवाई तिकीट मिळवून दिले गेले.

या प्रवाशांमध्ये गिरीश नायकवडी, विनय आगरखेड, सचिन पवार, प्रमोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. हे सर्व जण सहलीसाठी श्रीनगरमध्ये गेले होते. मात्र परतीच्या प्रवासासाठी आवश्यक तिकिटे मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले होते. या वेळी त्यांनी आमदार शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला.

शंकर भाऊंनी परिस्थितीची गंभीरता ओळखून लगेचच संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. दिल्ली व श्रीनगरमधील विमान कंपन्या, नागरी उड्डाण विभाग, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला. यामध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयानेही मोलाचे सहकार्य केले.

अखेर २३ एप्रिलच्या रात्री उशिरा या सर्व १४ जणांसाठी श्रीनगरहून पुण्याकडे येणाऱ्या विमानाचे तिकीट मिळाले. २४ एप्रिलच्या पहाटे चार वाजता हे सर्व जण श्रीनगरहून पुण्यास रवाना झाले.

या संपूर्ण घटनेबाबत बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “आमदारकीच्या तिकिटापेक्षाही मोठं तिकीट मला मिळालं — ते म्हणजे माझ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान. संकटात असलेल्या माणसांसाठी झटणं हेच माझं खरं कर्तव्य आहे.”

गिरीश नायकवडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार शंकर भाऊ जगताप तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. “आम्ही पूर्ण दिवसभर शंकर भाऊंच्या संपर्कात होतो. त्यांनी अगदी स्वतः लक्ष घालून आमच्या तिकीटांची सोय केली. ही एक अविस्मरणीय मदत आहे,” असे गिरीश नायकवडी यांनी सांगितले.

ही घटना राजकारणात मानवी स्पर्श आणि माणुसकीचा परिचय देणारी ठरली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!