शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय नागरिकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात भोईर यांनी नमूद केले की, शहरातील अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती सध्या हलाखीची आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च परवडणे अनेकांना कठीण जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या सर्व धर्मीय नागरिकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी.
यासंदर्भात ५ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ठरावही मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी २ मे २०१६ रोजी आदेशही काढले होते. मात्र, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे जनहिताच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी भोईर यांनी निवेदनातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्यातील तसेच देशातील विविध भागांमधून आलेल्या सर्व धर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास विशेषतः गरीब व गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
तसेच नाशिक, मुंबई, अंबरनाथ आणि कोल्हापूर महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारच्या योजना राबविल्या जात असल्याचे उदाहरण देत, त्या शहरांमधील कार्यपद्धतीचा अभ्यास करून पिंपरी-चिंचवडमध्येही प्रभावी योजना राबवता येऊ शकते, असेही भोईर यांनी नमूद केले.



