शबनम न्यूज | प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणांवर दगडफेक व मारहाण केल्याची घटना भोसरीतील सद्गुरुनगर परिसरात घडली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास हवेली हॉटेलसमोर, सद्गुरुनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी सतीश अर्जुन पाटील (वय ३४, सोलर व्यवसाय, रा. मंगलमुर्ती कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र आसिफ शेख, अजय साळवे व विजय साळुंखे हे हॉटेलसमोर उभे राहून गप्पा मारत असताना ओळखीचा आरोपी गोविंद रूपवते याने आसिफ शेख याच्याशी असलेल्या जुन्या वादाचे कारण काढून तेथे बेकायदेशीर गर्दी जमवली.
त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी इतर आरोपींनी दगडफेक केली. त्यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. तसेच त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, आसिफ शेख हा हॉटेलमध्ये पळून गेल्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्या, दगड तसेच टेबलावरील पाण्याचे ग्लास फेकून त्याच्यावरही हल्ला केला, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी सूरज सुखदेव लष्करे, ऋषिकेश हरी लोहार, पार्थ वसंत खुने, सोहेल जिलानी मुजावर व गोविंद रूपवते या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे करीत आहेत.


