शबनम न्यूज | प्रतिनिधी
फसव्या लिंकद्वारे मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख ४१ हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दाभाडे सरकार चौक परिसरातील अलंकार सोसायटी (फ्लॅट क्र. ७०६) येथे राहतात. दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ९१११८०७८०८ या क्रमांकावरून “REGALIAX MY CARD” या नावाने संदेश आला.
त्या संदेशातील लिंकवर क्लिक करून सहमती दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये “REGALIAX MY CARD” नावाचे अॅप डाउनलोड झाले.
या अॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने फिर्यादींचा मोबाईल हॅक करून त्याचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर फिर्यादींच्या मोबाईलमधील ONE CARD क्रेडिट कार्ड अॅपचा वापर करून त्यांच्या क्रेडिट कार्डमधून एकूण ६,४१,००० रुपये परवानगीशिवाय काढण्यात आले.
ही रक्कम “DRIVE TRACK PLUS CREDI HPCL” या नावाच्या खात्यावर ट्रान्सफर करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ मधील कलम ६६ (C) व ६६ (D) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करीत आहेत.


