शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक ०४:०० वाजता यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार्या या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार भूषविणार असून ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. यापूर्वी, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, राजाभाऊ गोलांडे, सुरेश घुले, अनिल भोसले, शांताराम भालेकर, उमा खापरे, सुलभा उबाळे या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे पिंपरी – चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली असून या सोहळ्यात राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डाॅ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत – वेणू पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नगरसेविका शिवानी नरळे यांना (वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार), आर. के. डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सचे संचालक राजाराम मलघे यांना (यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार) आणि ब्राईट इंडस्ट्रीजचे संचालक वसंत गायकवाड यांना (यशवंतराव चव्हाण उद्योगविभूषण पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी श्रमश्री बाजीराव सातपुते ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. नागरिकांनी या सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने
करण्यात आले आहे.


