spot_img
spot_img
spot_img

सीमा सावळे , राजेंद्र जगताप , फझल शेख यांना नगरसेवक पदाची संधी

राष्ट्रवादीकडून तीन स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; अनुभवी नेतृत्वाला संधी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन अनुभवी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी शिक्षण मंडळ सभापती फझल शेख आणि माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांचा समावेश आहे. आज या तिघांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अधिकृत अर्ज दाखल केले.

महापालिकेत राष्ट्रवादीचे ३७ नगरसेवक निवडून आल्यामुळे कायद्यानुसार पक्षाला तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यानुसार संघटनात्मक बांधिलकी, प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक कार्यातील सातत्य यांचा विचार करून या तिघांची निवड करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

महानगरपालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, विविध समित्यांमध्ये प्रभावी कामगिरी तसेच शहर विकासाबाबत स्पष्ट भूमिका या निकषांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. राजेंद्र जगताप यांनी नगरसेवक म्हणून विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सीमा सावळे यांनी स्थायी समिती सभापती म्हणून आर्थिक नियोजन आणि विकासकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवले होते. तर फझल शेख यांनी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांच्या उन्नतीसाठी काम केले आहे.

या तिघांच्या माध्यमातून महापालिकेत धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला बळ मिळेल, तसेच शहरातील प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवता येईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण विषयक मुद्द्यांवर हे सदस्य सक्रिय भूमिका बजावतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षच्या वतीने सात जणांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होत असून, आगामी काळात सभागृहात दोन्ही पक्षांमध्ये भूमिका अधिक ठळकपणे मांडल्या जाण्याची शक्यता आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदाचे अर्ज अधिकृतरीत्या सादर करण्यात आले.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनुभवी नेतृत्वाला संधी देत राष्ट्रवादीने आगामी काळात आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!