शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी ते आकुर्डी मार्गावरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. सचिन चिखले (मनसे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड) यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली असून, अन्यथा २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निगडी सिग्नल ते चिंचवड स्टेशन या मुख्य मार्गावर महा मेट्रोचे काम गेल्या एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे. या कालावधीत रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी तसेच लहान-मोठी वाहने मोठ्या संख्येने ये-जा करतात. परिणामी, खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून अजूनही अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
निगडी सिग्नल ते आकुर्डी दरम्यानची परिस्थिती अधिकच गंभीर असून, रस्त्यावर धुळीचे ढग, खोल खड्डे आणि विस्कळीत वाहतूक यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महा मेट्रोकडे पुरेसे बजेट असूनही कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत असल्याचे चिखले यांनी म्हटले आहे.
याचप्रमाणे श्रीकृष्ण मंदिर परिसरातील रस्ता गेल्या वर्षभरापासून खोदून ठेवण्यात आला असून तेथे कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
“लवकरात लवकर संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने २५ मार्च रोजी निगडी सिग्नल येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.
आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


