शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘जीवनात हास्यविनोद खूप महत्त्वाचा असतो. तो आपले दुःख दूर करीत नसला तरी सुसह्य नक्कीच करतो!’ असे विचार प्रसिद्ध हास्यकवी भालचंद्र कोळपकर यांनी मंगळवार, दिनांक ०३ मार्च २०२६ रोजी तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, पेठ क्रमांक २९, रावेत येथे नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होलिकात्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून
आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी सार्या…’ या विनोदी, विडंबन कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगारनेते अरुण बोऱ्हाडे, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, उपाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव माधुरी ओक, तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव शिरीष कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतविरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ नवयुगच्या वतीने आणि अरुण बोऱ्हाडे यांच्या हस्ते भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भोईर यांनी, ‘जीवनात खूप आघात सोसले; मात्र कला आणि साहित्य क्षेत्राने मला जगायला शिकवले. आता पालिकेच्या माध्यमातून शहरातील साहित्यिक अन् कलाकार यांच्यासाठी खूप काम करायचे आहे!’ अशी ग्वाही दिली. त्यापूर्वी राज अहेरराव यांनी, ‘गेली नऊ वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांची १०० पुस्तके पिंपरी – चिंचवड महापालिकेने विकत घ्यावी किंवा त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी रुपये १५०००/- (रुपये पंधरा हजार) सानुग्रह अनुदान देण्यात यावे, ही मागणी करत आलो आहोत. या वेळी ही मागणी पूर्ण होईल ही आशा आहे!’ अशी भूमिका मनोगतातून मांडली. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून चौतीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
‘रंगात रंगुनी सार्या…’ या कविसंमेलनात रेणुका हजारे, नेहा जाधवराव, अरुण अहिवळे, जयश्री श्रीखंडे, नीला चित्रे, दिगंबर दिवाण, सुखदा टंकसाळे, सुधाकर सोनार, मोहन उमरीकर, देवेंद्र गावंडे, योगिता कोठेकर, ज्ञानेश्वर मोरे, प्रतिमा काळे, चंद्रकांत धस, सुरेश कंक, अरुण कांबळे, उमेंद्र बिसेन, नंदकुमार कांबळे, अशोक टाकळे, प्रकाश चव्हाण, डाॅ. श्रीकृष्ण जोशी, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, प्रदीप गांधलीकर, जितेंद्र राय यांनी स्वरचित विनोदी आणि विडंबन कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत
उपस्थितांना हास्यरंगात भिजवून चिंब केले; तर संगीता सलवाजी आणि सविता इंगळे यांच्या कवितांचे सुप्रिया लिमये आणि सुभाष चव्हाण यांनी अभिवाचन केले. सहभागी कवी तसेच मान्यवरांवर पुष्पपाकळ्या आणि फुलांची उधळण करीत पर्यावरणपूरक धुळवड साजरी करून गंधित अन् आनंदित वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अनिकेत गुहे, प्रा. पी. बी. शिंदे, रजनी अहेरराव, अरविंद वाडकर, शरद काणेकर, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, रमेश वाकनीस, अरुणा वाकणीस, प्रकाश ननावरे, ॲड. अंतरा देशपांडे, राजू जाधव यांनी संयोजनात परिश्रम घेतले. माधुरी विधाटे यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले.


