शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभेचे कामकाज लाईव्ह करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मनपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पारदर्शक लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांसमोर खुले असणे अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड ही राज्यातील एक महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावलौकिक मिळवलेली महानगरपालिका आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय, विविध ठराव, विकासकामांवरील चर्चा तसेच करदात्यांच्या पैशांचे नियोजन या सर्व बाबी सर्वसाधारण सभेत ठरवल्या जातात. त्यामुळे या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधी सभागृहात कोणते प्रश्न मांडतात, तसेच प्रशासकीय निर्णयप्रक्रिया कशी पार पडते, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. प्रशासनात पारदर्शकता वाढावी आणि लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास दृढ व्हावा यासाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज मनपाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित करणे ही काळाची गरज आहे.
तसेच मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांसारख्या महानगरपालिकांमध्ये सभेचे कामकाज लाईव्ह करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने हे पाऊल उचलणे प्रशासनासाठी सहज शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनहित आणि पारदर्शकता लक्षात घेता आगामी सर्वसाधारण सभेपासूनच हे कामकाज लाईव्ह करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


