प्रभाग २३ मधील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आंदोलन – नगरसेविका योगिता बारणे यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक २३ मध्ये वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे परिसरात बकालपणा निर्माण होत असून यामुळे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी केला आहे. शासकीय अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर ताण येत आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या सेवांवर अतिरिक्त भार पडत असून प्रभागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून ही बांधकामे थांबवावीत, अशी ठाम मागणी बारणे यांनी केली आहे.
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था हीदेखील चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ड्रेनेज लाईनची चेंबर्स रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली नसल्याने पाणी साचते आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः गुरुनानक कॉलनी क्रमांक ३ येथे झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कचरा व्यवस्थापनाच्या समस्येमुळे प्रभागातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कचरावेचकांकडून कचरा एका ठिकाणी साठवला जात असल्याने दुर्गंधीचा त्रास वाढत असून भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. अरुंद रस्ते, अस्वच्छता आणि अपूर्ण नागरी सुविधा यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.

या सर्व प्रश्नांवर तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास ग प्रभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी दिला आहे. संबंधित ग क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांकडे त्यांनी निवेदन सादर करून प्रभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. सदर निवेदनाची प्रत विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांच्या कडे हि देण्यात आल्या ची माहिती योगिता महेश बारणे यांनी दिली आहे.भाऊसाहेब भोईर यांच्याकडे निवेदन देताना नगरसेविका भीमाताई फुगे, नगरसेविका प्रियंका ताई कुदळे, व सामाजिक कार्यकर्ते महेश बारणे उपस्थित होते


