पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात १४३/२०२६ असा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८४, १३४(अ) व १३४(ब) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मौजे वराळे, ता. खेड गावाच्या हद्दीत वराळे ते आंबेठाण रोडवरील मालपाणी कंपनीसमोर हा भीषण अपघात घडला. फिर्यादी शांतलींग शिवानंद स्वामी यांच्या भावाचा कुटुंबासह स्कुटीवरून प्रवास सुरू असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वाहन चालवत स्कुटीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सिद्रामय्या शिवानंद स्वामी (वय ३२) व त्यांचा चार वर्षांचा मुलगा श्रेयश यांना गंभीर दुखापत झाली असून पत्नी लक्ष्मी सिद्रामय्या स्वामी (वय २४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती न देता ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोटार पोलीस उपनिरीक्षक खरात करीत आहेत. पोलिसांकडून फरार ट्रक व चालकाचा शोध सुरू आहे.


