spot_img
spot_img
spot_img

दिघी मध्ये भव्य रक्तदान शिबिरात युवकांचा उस्फूर्त सहभाग

दिघी गाव विकासाचे शिल्पकार दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत नगरसेवक उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक १ मार्च रोजी उदय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात शहराचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी परिसरातील नगरसेवक-नगरसेविका, भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात युवक-युवतींसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. रक्तदात्यांचा सन्मान म्हणून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक लॅपटॉप बॅग भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विशेषतः तरुणांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या प्रभागात असे समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत दत्तात्रय गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

दिघी परिसराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि सामाजिक सुविधांच्या उभारणीत दत्तात्रय आबा गायकवाड यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबवून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक उदय दत्तात्रय गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते आणि सर्व सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून भविष्यातही अशा सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!