पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब
पिंपरी : संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आदेशाचा भंग करत घातक शस्त्र बाळगून थांबलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८/०२/२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पिंपरी ते नेहरुनगर रोडलगत एच.ए. ग्राउंड, संत तुकारामनगर येथे ही घटना घडली. पवन सचिन ससाणे (वय २१, रा. सुमेत बुद्ध विहाराजवळ, गांधीनगर, पिंपरी) हा आरोपी संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तपासणीदरम्यान त्याच्याकडे सुमारे ३०० रुपये किंमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.
आरोपीविरोधात यापूर्वी मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ-१ यांनी कार्यालयीन तडीपार आदेश क्र. ५२/२०२५ (दि. १७/१०/२०२५) अन्वये दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केले होते.
मात्र कोणतीही लेखी परवानगी न घेता त्याने या आदेशाचा भंग करून पुन्हा हद्दीत प्रवेश केला व घातक शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस शिपाई ज्ञानेश्वर आनंदराव भुरे (ब.नं. २५१३) यांनी केली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत ही कारवाई झाल्याने परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


