पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब
पिंपरी : विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल तयार करून वैज्ञानिक असल्याचे भासवत एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ नोव्हेंबर २०२४ पासून ते दि. ३० जानेवारी २०२५ या कालावधीत सिल्व्हर ट्विन डेक्स, फ्लॅट क्रमांक ४०२, ए-विंग, डेकॅथलॉन मॉलजवळ, ताथवडे येथे राहणाऱ्या एका महिला फिर्यादीची फसवणूक झाली.
आरोपी आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ जयेश पाटील (वय ३६, रा. कवडे हाशिवरे, कुरुळ, आरपीएफ कॉलनी, अलिबाग, जि. रायगड) याने jeevansathi.com या वेबसाईटवर ‘जयेश पाटील’ या नावाने खोटे प्रोफाईल तयार केले होते.
आरोपीने स्वतःला इस्रो कंपनीत वैज्ञानिक पदावर कार्यरत असून रसायणी, नवी मुंबई येथे राहत असल्याचे खोटे सांगून फिर्यादीशी संपर्क साधला.
विश्वास संपादन केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी विविध कारणे सांगून एकूण ४२ लाख ६४ हजार ३२ रुपये उकळले.
याबाबत फिर्यादीने सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केल्यानंतर फसवणूक झालेल्या रकमेपैकी १६ लाख ६४ हजार ३२ रुपये परत मिळाले असून उर्वरित २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी नागरिकांना विवाह संकेतस्थळांवरील ओळखींबाबत दक्षता बाळगण्याचे व आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.


