शबनम न्यूज | प्रतिनिधी
चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून पोलिसांनी सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त करून नष्ट केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजताच्या सुमारास मौजे काळुस गावच्या हद्दीत संगमवाडी, भीमा नदीच्या काठावर (ता. खेड, जि. पुणे) येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी अनिल दिगंबर सीतापुरे (वय ३२, रा. पत्रा चाळ, मोरेवस्ती, भुजबळ हॉस्पिटलजवळ, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) याने गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळ-मिश्रित रसायन मोठ्या प्रमाणात भिजत घातले असल्याचे आढळून आले.
छाप्यात सुमारे ५,००० लिटर गूळ-मिश्रित रसायन सापडले असून त्याची अंदाजे किंमत ७,५०,००० रुपये इतकी आहे. सदर साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस शिपाई सुमीत गौतम जगझाप (ब.नं. ४५७४) यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ढमढेरे करत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अवैध दारूविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


