शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला स्वयं आणि बाह्य मूल्यांकन मध्ये “स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन फ्रेमवर्क” (एसक्यूएएएफ) यात सहाव्या क्रमांकासह ‘अ +’ श्रेणी मिळाली आहे.
या सर्वेक्षणात १०,७१२ शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची राज्य शाळा मानक स्व-मूल्यांकनात निवड करण्यात आली.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शालेय गुणवत्ता, शिस्त आणि नूतन शिक्षणपद्धती, शालेय उपक्रम तसेच शाळाबाह्य उपक्रम राबविण्यात येतात.
महाराष्ट्रातील ही पहिली शाळा आहे जिथे सुसज्जित कौशल्य प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सीबीएससी च्या अध्यादेश प्रमाणे कौशल्याधिष्ठीत सर्व अभ्यासक्रम राबविले जातात. या सर्वेक्षणात शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम (कौशल्याधिष्ठित प्रयोग शाळा, पर्यावरण पूरक उपक्रम इत्यादी), सर्वसमावेशक अध्यापन अध्ययन पद्धती, पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन कार्यक्षमता हे सर्व निकष पूर्ण केले.
या शाळेला यापूर्वी स्वच्छ हरित विद्यालय रेटिंग मध्ये ४ स्टार रेटिंग, कला दर्पण अकादमीचा शैक्षणिक गोल्डन स्टार पुरस्कार, आनंददायी संस्थेचा पुरस्कार, भारतीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क संस्थेचा भविष्यातील अभिमुख शिक्षण प्रभाव पुरस्कार, पुण्यातील सर्वोत्तम सीबीएसई शाळेचा दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आणि टाइम्स स्कूल सर्वेक्षण २०२५ मध्ये विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्रगती असे पुरस्कार मिळाले आहेत. उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, समन्वयिका दर्शना कामत, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी एस. बी. पाटील स्कूलच्या शिक्षक, प्राध्यापक कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


