शबनम न्यूज | प्रतिनिधी
आकुर्डीतील नवनगर शिक्षण मंडळ संचालित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व उपयुक्त मॉडेल्स सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या प्रदर्शनात सौरऊर्जा, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उपयोग यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. विज्ञानविषयक संदेश देणाऱ्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी परिसर आकर्षक झाला.
संस्थेचे अध्यक्ष अनुप अविनाश मोरे, संस्थापक सचिव प्रा. डॉ. गोविंद दाभाडे, मुख्याध्यापक एकनाथ आंबले आणि विज्ञान विभाग प्रमुख विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


