spot_img
spot_img
spot_img

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खंजिरीच्या ठेक्यावर दणदणणारा भारदस्त आवाज… शब्दागणिक सामाजिक प्रबोधनाची ठिणगी पेटवणारी शाहिरी… आणि लोकसंगीताच्या सुरावटीतून मायमराठीच्या अस्मितेचा, परंपरेचा व अभिमानाचा जागर घडवणारा सुरेल महोत्सव… अशा दिमाखदार वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘माय मराठीची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला. सुर, ताल आणि ओजस्वी शब्दांच्या संगमातून साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे जणू मराठी संस्कृतीच्या वैभवाचा साक्षात उत्सवच ठरला.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहकार्याने

            चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महापालिकेने विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्यातर्फे ‘माय मराठीची गौरवगाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण संदेश विठ्ठल उमप, शाहीर पृथ्वीराज माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

साहित्य, लोकपरंपरा आणि संस्कृतीच्या सुरेल संगमातून साकारलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांच्या मनात अभिमानाची दीपमाळ प्रज्वलित केली. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, तिचा ऐतिहासिक वारसा आणि अस्मितेची ओळख यांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. संदेश विठ्ठल उमप आणि शाहीर पृथ्वीराज माळी यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच प्रेक्षागृहात महाराष्ट्रप्रेमाची लहर उसळली. ‘जयोस्तुते’, ‘हे सुरानो चंद्र व्हा’, ‘गवळण’, ‘मी डोलकर’, ‘बगळ्यांची मान फुले’, ‘किती सांगू मी सांगू’, ‘नेसते पैठणी चोळी’, ‘तरी म्या सांगता होतो’, ‘जांभूळ’ आख्यान, ‘आम्ही ठाकरं’, ‘लिंगोबाचा डोंगर’ अशा गीतांनी लोकसंस्कृतीची सजीव झलक साकारली. ‘फु बाई फु’, ‘माझी मैना’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘लग्नाला चला’, ‘म्यानातून उसळे’, ‘मुंबईत उंचावरी’, ‘दादा आम्ही’, ‘आज कोळीवाऱ्यात’, ‘मध्यंतर हंडा’ अशा विविधरंगी सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. अखेरीस ‘ने मजसी ने’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाचा समारोप होताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.

संदेश विठ्ठल उमप यांना प्रवीण डोणे, विजय कर्जावकर, धीरज पारकर, रागिणी मुंबईकर, कोमल दांडे, वैशाली गोखले, प्रज्ञा वळंजू या गायकांनी सुरेल साथ दिली. तर वाद्यवृंदात महेश लोखंडे, अशोक नरवडे, किरण यादव, माही ढोके, संजय गायकवाड, तृषार्त जामसंडेकर, ऋषिकेश मोहिते, प्रवीण मोरे यांनी आपल्या ताल-सुरांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

शाहीर सम्राट देवानंद माळी यांच्यासह महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अरुण बो-हाडे  यांच्यासह रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. कार्यक्रमाचे निवेदन संतोष लिंबोरे यांनी केले.

सामाजिक जाणीव व सांस्कृतिक अस्मितेचा संगम

शाहीर पृथ्वीराज माळी यांनीही आपल्या दमदार आवाजातून ‘गोंधळाला या ग’, ‘सुंदर ते धान्य’, ‘सांगा धनाचा साठा’, ‘माझ्या भीमराया’, ‘गाडी घुंगराची आली’, ‘पोवाडा महाराष्ट्राचा’, ‘आंबा लाडे लाडे’, ‘जोगवा’ ही गीते सादर करत सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अस्मितेचा संगम घडवला. शाहीर पृथ्वीराज माळी यांना शाहीर अभंगराज माळी, अवधूत पवार, आदिती पवार यांनी साथ दिली, तर ढोलकीवर राजू घोलप यांच्या ठेक्यांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यास वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!