तीन दिवसांत ३९९ सायलेंसर नष्ट
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नागरिकांना बुलेट वाहनांच्या कर्णकर्कश सायलेंसर आवाजामुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
बुलेटच्या सायलेंसरमध्ये फेरफार करून वाहन चालविणाऱ्यांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये सायलेंसरमध्ये फेरफार केलेल्या वाहनचालकांवर १४,५१२ केसेस नोंदवून १ कोटी ४४ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १,८५३ केसेस करून १८ लाख ५३ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, २४ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या १३ वाहतूक विभागांमार्फत सायलेंसरमध्ये फेरफार केलेल्या ३६८ बुलेट वाहनांवर कारवाई करून सायलेंसर जप्त करण्यात आले. यापूर्वी जमा झालेल्यांसह एकूण ३९९ सायलेंसर आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृतरीत्या निष्कासित (नष्ट) करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी वाहनांमध्ये कोणताही बेकायदेशीर बदल करू नये, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


