भोसरीत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम ठप्प; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रियांका बारसे यांची प्रशासनाला तातडीची सूचना
पिंपरी-चिंचवड : शहरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून भोसरी परिसरातील आदर्श शिक्षण संस्थेसमोरील काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प पडले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत माजी नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांनी संबंधित अभियंत्यांची भेट घेऊन तातडीने काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
सदर ठिकाणी शाळा सुरू असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे तसेच उघड्यावर टाकलेले मोठे पाईप यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही लहान मुले या पाईपवर उड्या मारताना दिसत असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय साईसिद्ध कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक न बसवल्यामुळे नागरिकांना चिखल व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून शाळा सुटण्याच्या वेळेस मोठी कोंडी निर्माण होते. तीन ते चार जेसीबी यंत्रे शाळेसमोरच पार्क करून ठेवण्यात आल्याने रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही या कामाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काम सुरू करून ते अर्धवट सोडल्यामुळे परिसरातील व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे.
प्रियांका बारसे यांनी अभियंत्यांना कामाचा ठोस आराखडा जाहीर करून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच तात्पुरती सुरक्षा कुंपण, इशारा फलक, वाहतूक व्यवस्थापन आणि खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली. कामात होत असलेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन काम गतीमान करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


