spot_img
spot_img
spot_img

परराज्यातील कामगारांसाठी वर्क परमिट सक्तीचे करा; शहर सुरक्षेसाठी विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

परराज्यातील कामगारांसाठी वर्क परमिट सक्तीचे करा; शहर सुरक्षेसाठी विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी नोंदणीकृत वर्क परमिट सक्तीचे करण्याची मागणी केली आहे. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिक क्षेत्र आणि बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेता शहराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड हे कामगारनगरी आणि उद्योगांची पंढरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह नेपाळ, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक रोजगार, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या नियमांनुसार भाडेकरू नोंदणी बंधनकारक असली तरी प्रत्यक्षात शंभर टक्के नोंदणी होत नसल्याची खंत भोईर यांनी व्यक्त केली.

अलीकडील काही गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, सांगवी परिसरात बेकायदेशीररीत्या म्यानमारमधील नागरिक वास्तव्यास असल्याचे प्रकरण उघड झाले. ही बाब शहर सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, अशा घटना टाळण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने समन्वय साधणे अत्यावश्यक आहे.

भोईर यांनी सुचविले आहे की, परराज्यातून कामासाठी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नाममात्र शुल्क आकारून वर्क परमिट देण्यात यावे. तसेच संबंधित व्यावसायिक, उद्योगमालक, हॉटेल व्यावसायिक यांनी आपल्या कामगारांचे वर्क परमिट घेणे बंधनकारक करावे. या प्रक्रियेत चरित्र पडताळणीही अनिवार्य केल्यास शहरातील नागरिकांची अचूक संख्या, स्थलांतरित कामगारांची माहिती आणि सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

“या शहराने कुणालाही परके मानले नाही; मात्र शहराच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. स्थानिक भूमिपुत्र आणि कायमस्वरूपी रहिवाशांच्या हक्कांसह शहराच्या कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असे भोईर यांनी स्पष्ट केले.

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर कठोर नियमावली तयार करून वर्क परमिट प्रणाली लागू करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!