शबनम न्यूज | प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज वरळी डोम येथील सभागृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल पटेल यांनी जाहीर केले.
प्रफुल पटेल यांनी यावेळी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या नेतृत्वाविषयी बोलताना पटेल म्हणाले, ज्या प्रकारे एखादा सेनापती सैन्याच्या पुढे उभा राहून नेतृत्व करतो, त्याप्रमाणे अजित पवार सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत होते. त्यामुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगल्या संख्येने आमदार निवडून आले.


