spot_img
spot_img
spot_img

वानवडी घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पुणे पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील Associates Blenders Pvt Ltd या कंपनीत काम करणाऱ्या श्रीमती वैशाली मारुती भोसले यांच्या मृत्यू प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तपासातील गंभीर त्रुटी, उशिरा FIR नोंदवणे, आरोपींना अटक न करणे आदी बाबींकडे लक्ष वेधत त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन (दि.२५) रोजी दिले आहे.

घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली असताना FIR मात्र २४ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली (FIR क्र. ००६४/२०२६). हे संशयास्पद असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. शवविच्छेदन (पंचनामा) वेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित नसणे ही देखील गंभीर बाब आहे. केवळ क्रेन ऑपरेटर व कंत्राटदार यांच्याविरुद्धच FIR नोंदवण्यात आली असून, कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांचा समावेश न करणे, अपघाती मृत्यूऐवजी सदोष मनुष्यवध ( culpable homicide) सारख्या गंभीर कलमांतर्गत कारवाई न करणे यावर डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासावे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदरचा तपास करावा. सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. तपासातील निष्काळजीपणा, उशिरा गुन्हा दाखल करणे याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करावी.

तसेच, मयत वैशाली भोसले यांच्या वारसांना इन्शुरन्स क्लेम, ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड, अपघात नुकसान भरपाई इत्यादी सर्व लाभ तातडीने मिळवून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणातील कारवाईचा अहवाल उपसभापतींच्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

डॉ. गोऱ्हे या सदर प्रकरणात पीडितेला आणि तिच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कंपनी आणि प्रशासनाला जाब विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!