spot_img
spot_img
spot_img

‘ऑपरेशन मुस्कान–१४’मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची भरीव कामगिरी

१२१ हरवलेली बालके सुखरूप शोधली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हरवलेल्या १८ वर्षाखालील बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान–१४’ या विशेष मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १२१ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द केले आहे.

या यशामुळे शहरात पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्यात महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० जानेवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) यांनी स्वतः लक्ष घालत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना व मार्गदर्शन दिले होते.

२१४ प्रकरणांचा आढावा

सन २०१८ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अपहरण व हरविल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, ३० बालके व १८४ बालिका, अशी एकूण २१४ बालके हरविल्याची नोंद आढळून आली.

या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन मुस्कान–१४’ अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने संयुक्तपणे विशेष पथके तयार करून शोध मोहीम राबवली.

दोन टप्प्यांत मोठे यश
या मोहिमेत,जुन्या प्रकरणांपैकी ११ बालके व ६० बालिका, अशी ७१ बालके शोधण्यात आली.

तसेच, दिनांक २०/०१/२०२६ ते २०/०२/२०२६ या कालावधीत नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील १६ बालके व ३४ बालिका, अशी ५० बालके शोधून काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण २७ बालके व ९४ बालिका, म्हणजेच १२१ हरवलेली बालके त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे.

संयुक्त प्रयत्नांचे फलित

ही कामगिरी पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड,अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या समन्वयातून पार पडली.

नागरिकांकडून कौतुक

हरवलेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबात परत मिळवून देणे हे केवळ कायदेशीर कर्तव्य नसून सामाजिक जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशाच प्रभावी शोध मोहिमा राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!