spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये चहाच्या टपरीसमोर पैसे मागून तरुणावर प्राणघातक हल्ला; तीन आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

चाकण (ता. खेड) – तळेगाव चौक येथील येवले चहाजवळ पैसे मागण्याच्या उद्देशाने एका तरुणावर व त्याच्या भावावर दगड, हात व लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही घटना दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी योगेश मधुकर मुंगडे (वय २०, रिक्षा चालक, रा. नाणेकरवाडी, चाकण) हे येवले चहासमोर उभे असताना आरोपींनी पैसे मागितले. पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपी नामदेव प्रकाश नाईक (२४), लोकेश विलास खंडाळे (२७) व दिप्तेश विलास खंडाळे (२५) यांनी फिर्यादी व त्यांचा भाऊ हनुमंत मुंगडे यांना दगडाने, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात हनुमंत मुंगडे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. तसेच आरोपींनी “थांब, तुझा मर्डरच करतो,” अशी धमकी देत मोठा दगड उचलून फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २.०२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३०८(२), ३(५), ३५१(२) तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी क्रमांक १ ते ३ अटक असून पुढील तपास पोउपनि मोते करत आहेत.

घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!