पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
चिंचवड (पुणे) – नवीन व्यवसाय व पतसंस्था सुरू करून देण्याचे तसेच एक गुंठ्याचा प्लॉट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी अटकपूर्व आहेत.
फिर्यादी सौ. प्रियांका स्वप्निल पोटे (वय ३४, गृहिणी, रा. अमन सोसायटी, आकुर्डी-चिखली रोड, महात्मा फुलेनगर, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यांच्या वडील दिलीप राधा किसन औताडे (रा. निर्मलनगर, शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्यादी व त्यांचे पती स्वप्निल श्रीधर पोटे यांचा विश्वास संपादन केला.
नवीन व्यवसाय सुरू करून देतो, नवीन पतसंस्था स्थापन करून त्यात सभासद करतो, तसेच २५ लाख रुपये भरल्यानंतर एक गुंठ्याचा प्लॉट देतो, असे आश्वासन देत आरोपी दिलीप औताडे यांनी फिर्यादींच्या पतीकडून वेळोवेळी २३ लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेतील खात्यात स्वीकारले. याशिवाय फिर्यादींचा भाऊ शुभम दिलीप औताडे यानेही आपल्या बँक खात्यात २ लाख रुपये ऑनलाइन घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
एकूण २५ लाख रुपये स्वीकारूनही आरोपींनी कोणताही नवीन व्यवसाय सुरू केला नाही, पतसंस्था स्थापन केली नाही तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे प्लॉटही नावावर करून दिला नाही. ही रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी व त्यांच्या पतीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.


