पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
दिघी (पुणे) – मुलीच्या कॉलेज प्रवेशासाठी मदत करतो असे सांगून ५ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार दिघी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकपूर्व आहे.
फिर्यादी बिरनारायण गोरख सिंग (वय ४६, व्यवसाय – बांधकाम, रा. ड्रीम्स कार्निवल सोसायटी, चऱ्होली फाटा, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ एप्रिल २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी तसेच देवरहिप्परगी, ता. सिंदगी, जि. बिजापूर (कर्नाटक) येथे आरोपी शरणगौड रुद्रगौड बिरादार (वय ४८) याने त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाईन, आरटीजीएस व रोख स्वरूपात एकूण ५,४५,००० रुपये स्वीकारले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपीने कोणताही प्रवेश करून दिला नाही. प्रवेश न झाल्याने फिर्यादींनी रक्कम परत मागितली असता आरोपीने टाळाटाळ केली तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बीएनएस कायदा कलम ३१६(२), ३१८(४), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत. कॉलेज प्रवेशाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


