पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
जास्त परताव्याचे आमिष दाखवून व्हॉट्सॲप ग्रुप व मोबाईल अॅपच्या माध्यमातून १४ लाख २९ हजार ९० रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकपूर्व आहेत.
फिर्यादी नितीन कुमार सिन्हा (वय ३७, नोकरी, रा. कोकोनेस्ट सोसायटी, राहटणी चौक, पिंपळे सौदागर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्यांना “NOMURA AHD U 154” नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले.
या ग्रुपमध्ये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले.
ग्रुपमध्ये Nomura नावाच्या अॅपची लिंक पाठवण्यात आली. लिंकवर क्लिक केल्यानंतर अॅपमध्ये प्राजक्त सांमत हा स्वतःला स्टॉक खरेदी-विक्रीचा सल्लागार असल्याचे सांगत गुंतवणुकीचे मार्गदर्शन करत होता.
तसेच फिर्यादी यांच्या वैयक्तिक व्हॉट्सॲपवर नेहा आय्यर (मो. 7501136398) नावाच्या महिलेने संपर्क साधून जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
मात्र गुंतवणुकीनंतर कोणताही परतावा न देता तसेच मूळ रक्कमही परत न करता विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारात फिर्यादींची एकूण १४,२९,०९० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी करीत आहेत.
पोलीसांनी नागरिकांना ऑनलाईन गुंतवणूक, व्हॉट्सॲप ग्रुप्स व अज्ञात अॅप्सबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


