पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोबाईल अॅप व व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ४२ लाख ४८ हजार ९०० रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकपूर्व आहेत.
फिर्यादी महेश विलास सगरे (वय ५१, नोकरी, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते २५ डिसेंबर २०२५ दुपारी १२ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला तसेच “V3YES Security” नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना सामील करून घेतले.
आरोपींनी फिर्यादींना “YES SECURITY” नावाचे मोबाईल अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. या अॅपवर शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला.
त्यानंतर वेगवेगळ्या शेअर्सच्या ट्रेडिंगच्या नावाखाली तसेच नफा काढण्यासाठी टॅक्स, चार्जेस आदी कारणे सांगत विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.
अॅपवर दाखवलेला नफा खोटा असल्याचे नंतर उघड झाले. भरलेली रक्कम किंवा दाखवलेला नफा परत न देता आरोपींनी फिर्यादींची एकूण ४२,४८,९०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बी.एन.एस. २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव करीत आहेत.
पोलीसांनी नागरिकांना अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप, शेअर ट्रेडिंग अॅप्स व जास्त परताव्याच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


