शबनम न्यूज | प्रतिनिधी
अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, वारकरी भवन उभारणी तसेच प्रभाग क्र. १४ मधील आरक्षण, DP प्लॅन आणि इतर प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने त्या अनुषंगाने भव्य आणि सुसज्ज वारकरी भवन उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पालखी तळावरील विठ्ठल मंदिर, आकुर्डी परिसरातील अतिक्रमण काढणे व परिसराचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रभाग क्र. १४ मधील विविध आरक्षणे ताब्यात घेऊन त्यांचा नियोजनबद्ध विकास करणे, DP रोडवरील अतिक्रमणे हटवून रस्ते रुंद करणे आणि वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस प्रभाग क्र. १४ चे विद्यमान नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशालीताई काळभोर, अरुणाताई लंगोटे, नगरसेवक कैलास कुटे, देहू संस्थानचे वैभव महाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, अ प्रभाग अधिकारी घार्गे मॅडम, कार्यकारी अभियंता ननावरे मॅडम तसेच उपअभियंता कांबळे साहेब उपस्थित होते.
सदर बैठकीत उपस्थित मान्यवरांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.


