शबनम न्यूज | प्रतिनिधी
नियमांचे वारंवार उल्लंघन करून बेकायदेशीररित्या डान्स बार चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, डान्स बारविषयक नियमांची पुन्हा-पुन्हा पायमल्ली करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक नव्हे तर कठोर कायदेशीर कारवाई होईल, अशी प्रभावी तरतूद कायद्यात समाविष्ट केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, महिलांचे संरक्षण आणि सामाजिक शिस्त राखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या घोषणेमुळे बेकायदेशीर डान्स बारविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.


