महापौर रवि लांडगे यांनी घेतली आरोग्य विभागाची घेतली आढावा बैठक…
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या रात्रीच्या स्वच्छता उपक्रमासह आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा महापौर रवि लांडगे यांनी आज घेतला. यावेळी रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत महिलांची शिफ्ट बंद करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संबंधित अधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे फायदे जाणून घेतल्यानंतर रात्रीची स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी; मात्र त्यामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवावा, असेही ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेचा रोडमॅप तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील कचरा संकलन, कचऱ्याचे विलगीकरण, त्याची वाहतूक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते साफसफाई, पाणी स्वच्छता यासह विविध आरोग्यविषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, अजिंक्य येळे, राजाराम सरगर, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, पूजा दूधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आरोग्य निरीक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनीही आरोग्य विभागाच्या संबंधित विविध विषयांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देत येणाऱ्या अडचणी मांडल्या. मनुष्यबळ, वाढती लोकसंख्या आणि काही भागांतील अंमलबजावणीतील अडथळे यावर त्यांनी प्रकाश टाकला. या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करून शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
‘माझी वसुंधरा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल केले अभिनंदन
पिंपरी चिंचवड महापालिकेला ‘माझी वसुंधरा’ हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी असल्याचे सांगत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.


