शबनम न्यूज | प्रतिनिधी
आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त २२ फेब्रुवारी रोजी चिंतनदिन (विचारदिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता १ ली ते ७ वी मधील कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला. कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. श्री. गोविंदराव दाभाडे सर अध्यक्षस्थानी होते, तर श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, यमुनानगरचे मुख्याध्यापक हेमंत अभोणकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी चिंचवड येथील श्री जैन फत्तेचंद विद्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात विद्यालयाच्या समूहाने उल्लेखनीय कामगिरी केली. नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तंबू सुशोभीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक आणि शोभायात्रेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
माननीय मोठे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन कैलास कोशिरे सर यांनी केले, तर शिक्षक मनोगत व आभार प्रदर्शन सौ. प्रतिमा काळे मॅडम यांनी व्यक्त केले. विद्यार्थी व शिक्षकांनी सर्वधर्मीय प्रार्थना सादर करून एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. भारती भोंगाडे, योगेश पाटील व अमोल गुंड सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
चिंतनदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


