शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १८, केशवनगर चिंचवड येथे चैतन्य मेडीको जवळ उद्यम सहकारी बँकेसमोर असलेल्या महत्त्वाच्या चौकात गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरजवळ मोठे व धोकादायक खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्याच्या मध्यभागीच हा खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काही नागरिकांना दुखापतही झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अनेक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर भाजपचे मधुकर बच्चे यांनी नागरिकांसह संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
“मुख्य चौक आणि मुख्य रस्ता असतानाही इतका मोठा खड्डा दोन महिन्यांपासून तसाच कसा राहू शकतो? आजपर्यंत ज्या नागरिकांना इजा झाली, उपचारासाठी खर्च करावा लागला, त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल मधुकर बच्चे यांनी उपस्थित केला.
मधुकर बच्चे यांनी संबंधित विभागाला या गंभीर परिस्थितीची माहिती देत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या धोकादायक खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासन जागे होणार का, याकडे प्रभाग १८ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


