spot_img
spot_img
spot_img

सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र! – डॉ. संजय उपाध्ये

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेतील अमृतमहोत्सवी ७५ वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘विचार करूनच बोला!’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक राहुल कलाटे, शेखर चिंचवडे, नगरसेविका मनीषा चिंचवडे आणि गांधी पेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

श्रीरंग बारणे यांनी, ‘विविध विषयांवर सलग पंचाहत्तर मासिक प्रवचनांतून डॉ. संजय उपाध्ये यांनी हिंदुत्वाची चळवळ सक्षम केली असून आता तरुणांनी या समाजप्रबोधनाच्या प्रवाहात सामील व्हावे!’ असे आवाहन केले. शंकर जगताप यांनी, ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव काळात प्रवचनांचा अमृतमहोत्सव ही कौतुकास्पद बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढले. रवी लांडगे यांनी, ‘कला, साहित्य, संस्कृती याविषयीचे ज्ञान प्रवचनातून प्राप्त होते!’ असे विचार व्यक्त केले. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, ‘डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मन करा रे प्रसन्न!’ प्रवचनमालिकेतून केलेले प्रबोधन पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’ची आठवण करून देणारे आहे!’ असे मत व्यक्त केले.

डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, ‘सद्गुणाचा अतिरेक हीदेखील विकृती आहे. सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता या गोष्टींच्या अतिरेकामुळे हिंदू समाज आपले अस्तित्व हरवत चालला आहे. त्यासाठी हिंदू समाजाला एकत्र येण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे हिंदूंनी जातिभेदासह सर्व भेदाभेद दूर सारून आपापसात सुसंवाद साधला पाहिजे. अर्थातच व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र या परिघात संवादाची व्याप्ती वाढली पाहिजे. त्यासाठी आधी स्वतःशी मग कुटुंब, समाज आणि राष्ट्राशी संवाद साधा. संवादात विचार करूनच बोलले पाहिजे; कारण एकदा तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. ज्ञानेश्वरमाउलींनी ‘बोल ते जे अर्णव पीयूषाचे…’ असे वर्णन केल्याप्रमाणे आपले बोलणे हवे. अर्थातच ज्याला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत बोलल्यावरच माउलींचे ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो!’ हे हिंदुधर्माबाबतचे स्वप्न पूर्णत्वास जाईल!’ आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ उद्धृत करीत आपल्या नर्मविनोदी शैलीतून डॉ. संजय उपाध्ये यांनी श्रोत्यांशी सुसंवाद साधला. यावेळी चंद्रशेखर निलाखे यांनी श्रोत्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

ॲड. विपुल नेवाळे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अवधूत कुलकर्णी, महेश गावडे, अनिरुद्ध येवले, बापू मिरजकर, सिद्धी नेवाळे, सुजाता पोफळे, बंडू भोकरे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!