spot_img
spot_img
spot_img

३० लाखांच्या शहरात वाढते प्रदूषण; ‘इ-वाहन’ धोरणासाठी विशाल काळभोर यांचे महापालिकेला निवेदन

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड : देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासमोर आता वायू प्रदूषणाचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचली असून, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या तब्बल २५ लाखांच्या आसपास गेल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. वाढती लोकसंख्या, वेगवान नागरीकरण आणि बेसुमार वाहनवाढ यामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता घसरत चालली आहे.

सध्या शहरातील AQI (Air Quality Index) पातळी १३५ ते १५० दरम्यान नोंदवली जात असून ही पातळी World Health Organization (WHO) ने निर्धारित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा सुमारे १० पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार, दमा, अॅलर्जी, डोळ्यांची जळजळ, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल काळभोर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत —

शहरातील धूर, धूळ व रसायनमिश्रित धुरावर नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी करावी.

बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी, जाळी आच्छादन अनिवार्य करावे.

महापालिकेच्या ताफ्यातील सर्व वाहने टप्प्याटप्प्याने ‘इ’ (इलेक्ट्रिक) वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे धोरण जाहीर करावे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करून नागरिकांना खासगी वाहनांऐवजी बस व मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे.

शहरात अधिकाधिक हरित पट्टे, वृक्षारोपण व ऑक्सिजन पार्क उभारण्यावर भर द्यावा.

प्रदूषण मोजणी केंद्रांची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागात AQI माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी.

औद्योगिक क्षेत्रातील धुराचे उत्सर्जन नियमित तपासणीद्वारे नियंत्रणात ठेवावे.

विशाल काळभोर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “विकासाच्या स्पर्धेत शहर पुढे जात असले तरी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असेल, तर तो विकास नव्हे. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पर्यावरणपूरक धोरण राबवावे.”

शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणासोबत पर्यावरणीय संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. आता महापालिका प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!