शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण व्यवस्थेवरील निष्काळजीपणाचा ठोस मुद्दा उपस्थित करत प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी प्रशासनाला थेट जाब विचारला.
सभागृहात बोलताना बारणे यांनी शहरातील महापालिकेच्या एकूण 105 शाळांमध्ये ‘डेटा ऑपरेटर’ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याचा गंभीर मुद्दा मांडला. या रिक्त पदांमुळे शाळांचे संपूर्ण ऑनलाइन कामकाज ठप्प झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, शासकीय अहवाल, शिष्यवृत्ती प्रक्रिया, विविध शैक्षणिक पोर्टलवरील कामे यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“डिजिटल युगात शिक्षण क्षेत्र ऑनलाइन पद्धतीवर अवलंबून असताना डेटा ऑपरेटर नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
याच सभेत बारणे यांची शिक्षण समिती सदस्यपदी नियुक्ती जाहीर झाली. शिक्षण समितीवर निवड होताच पहिल्याच सभेत त्यांनी शिक्षणाशी निगडित मूलभूत प्रश्न मांडत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट बोट ठेवले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची सभागृहात दखल घेण्यात आली.
महापालिकेच्या सर्व 105 शाळांमध्ये तातडीने डेटा ऑपरेटरची नियुक्ती करून ऑनलाइन कामकाज सुरळीत करावे, अशी ठोस मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिक्षणासारखा संवेदनशील मुद्दा प्रभावीपणे मांडत बारणे यांनी सक्षम आणि जागरूक नेतृत्वाचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे शहरभर त्यांचे अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.



