घरकुल वसाहत, चिखली (पुणे) – समस्त घरकुलवासी व शिव–पार्वती भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा ११ वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीही दि. ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. सलग अकराव्या वर्षी पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सप्ताहाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गोकुळधाम, वृंदावन येथील साध्वी देवी वैभवीश्रीजी दीदी यांच्या सान्निध्यात दररोज सायंकाळी झालेले संतचरित्र कथन व भागवत कथामृत. त्यांच्या ओजस्वी, प्रभावी व हृदयस्पर्शी वाणीमधून भक्ती, वैराग्य, सदाचार आणि संस्कार यांचे अनमोल संदेश श्रोत्यांच्या अंत:करणात रुजले.
सप्ताहादरम्यान संत परंपरेचा वैभवशाली वारसा उलगडत संत भानुदास, संत मीराबाई, संत नामदेव, संत सूरदास, संत मुक्ताबाई, संत कबीर, संत गुलाबराव महाराज आणि संत तुकाराम यांच्या जीवनचरित्र, अभंग, विचारधारा आणि समाजप्रबोधनपर कार्याचा प्रभावी आढावा घेण्यात आला. संतांच्या शिकवणीतून समाजाला योग्य दिशा देण्याचा संदेश या कथामालेतून देण्यात आला.
दररोज पहाटे काकड आरती, सामूहिक हरिपाठ, ग्रंथ पारायण, महिला व पुरुष वारकरी भजन मंडळांचे सुमधुर भजन, हरिनाम संकीर्तन तसेच महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. ‘राम कृष्ण हरि’, ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि ‘ॐ नमः शिवाय’ च्या अखंड गजराने हरिहर मंदिर, श्रीराम चौक व संपूर्ण घरकुल वसाहत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
सप्ताहातील विशेष आकर्षण ठरला तो राधा–कृष्ण विवाह सोहळा. भाविकांनी आकर्षक वेशभूषेत सहभाग घेत सजीव सादरीकरण केले. या देखण्या सोहळ्यामुळे परिसरात जणू वृंदावनाचीच अनुभूती निर्माण झाली.
समारोपाच्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या चरित्र कथनावेळी संत तुकाराम महाराज व त्यांचे चौदा वारकरी अशा वेशभूषेत भाविक सहभागी झाले. या सजीव देखाव्यामुळे संतपरंपरेचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहून उपस्थित भाविक भावविवश झाले.
घरकुल वसाहतीतील नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घेतला. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. युवक–युवती, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण आयोजन अत्यंत यशस्वी व शिस्तबद्धरीत्या पार पडले.
समारोपप्रसंगी महाप्रसाद वितरण करण्यात आले. भक्ती, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि वारकरी परंपरेचे जतन करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भाविकांच्या मनात चिरंतन स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


