spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठाम भूमिका ; डॉ. वैशालीताई घोडेकर लोंढे यांची ठोस मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मा. महापौर तथा विद्यमान नगरसेविका डॉ. वैशालीताई घोडेकर लोंढे यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत ठोस आणि ठाम भूमिका मांडली.

गेल्या काही महिन्यांत भटक्या कुत्र्यांकडून चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहनांच्या मागे लागून अपघात होणे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ल्यांचे प्रकार घडणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत संध्याकाळनंतर बाहेर पडणेही धोकादायक बनले असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून शहराबाहेरील किंवा मोकळ्या जागेत स्वतंत्र व सुरक्षित परिसर उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्या ठिकाणी मजबूत कंपाउंड वॉल, सीसीटीव्ही यंत्रणा, पशुवैद्यकीय सुविधा, अन्न-पाणी व्यवस्था आणि नियमित देखभाल यांचा समावेश असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखताना प्राण्यांनाही मानवीय आणि सुरक्षित वातावरण मिळावे, हा या प्रस्तावामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच संबंधित विभागाने तातडीने सर्वेक्षण करून योग्य जागा निश्चित करावी, आवश्यक निधीची तरतूद करावी आणि निश्चित कालमर्यादेत कृती आराखडा सादर करावा, अशी मागणीही सभागृहात करण्यात आली.

“नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत तातडीचा आहे. यावर केवळ चर्चा नको, तर त्वरित आणि प्रभावी कृती व्हावी,” अशी ठाम भूमिका डॉ. वैशालीताई घोडेकर लोंढे यांनी मांडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!