शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवी सांगवी परिसरात वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२, ३५१(३), ३(५) तसेच आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास सुमारस राजाराम नगर, वाबजाई चौक, नवी सांगवी येथे हा प्रकार घडला. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलावर हल्ला केला. आरोपींमध्ये प्रथमेश गणेश शिंदे (वय २१, व्यवसाय – हमाली, रा. राजाराम नगर, नवी सांगवी) याच्यासह आणखी दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
आरोपींनी लोखंडी कोयता व दगडांचा वापर करून पीडित मुलावर वार केले. तसेच शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात अल्पवयीन मुलाला गंभीर जखमा झाल्या असून उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर सांगवी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


