spot_img
spot_img
spot_img

चिखलीत दहशत माजवून तरुण व त्याच्या मित्रावर कोयत्याने हल्ला; चार जणांवर गुन्हा, एक अल्पवयीन ताब्यात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड शहरातील चिखली परिसरात जुन्या वादातून दहशत माजवत तरुण व त्याच्या मित्रावर कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट तसेच भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असून तो ताब्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अष्टविनायक चौक, मोरवस्ती, चिखली येथे ही घटना घडली. फिर्यादी सिद्धेश अशोक वाघमारे (वय १८, रा. मोरवस्ती, चिखली) व त्यांचा मित्र वेदांत शांताराम लोखंडे हे परिसरात असताना आरोपी क्रमांक १ हरिष राकेश त्रिपाठी (वय १८) व एका अल्पवयीन आरोपीने “आम्ही इथले दादा आहोत” असे म्हणत आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली.

त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रावर कोयत्याने डोक्यावर व पायावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपी अमर घोडके, गणेश राठोड व सोन्या जाधव यांनी देखील लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हल्ल्यात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिखली पोलिसांनी आरोपी क्रमांक १ ला अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे मोरवस्ती–चिखली परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!