शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहरातील चिखली परिसरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून ८ ग्रॅम ३ मिलीग्रॅम एमडी, दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवारवस्ती ते डायमंड चौक रोडलगत, राघव रिद्धी ऑफिसजवळील मोकळ्या जागेत, कुडळवाडी, चिखली येथे करण्यात आली. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज फैजुल्ला खान (वय ३५, रा. मोरेपाटील चौक, मोरे यांची चाळ, कुडळवाडी, चिखली, पुणे) असे आहे. तपासात आरोपी हा एमडीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने तो अंमली पदार्थ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिस तपासात सदर एमडी हा आरोपीला वाजू सईद (रा. मुंबई) याच्याकडून विक्रीसाठी मिळाल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून पुरवठा साखळीचा सखोल तपास सुरू आहे.
सदर कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण ज्ञानेश्वर सावळे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू असून, या कारवाईमुळे चिखली–कुडळवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीला मोठा धक्का बसला आहे.


