शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहरात घडलेल्या चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बीड जिल्ह्यातील सराईत दोन आरोपींना अटक करून २८ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम वजनाचे अंदाजे ४ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच १.५० लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत चार चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत चेन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व युनिट्सना स्पष्ट मार्गदर्शन दिले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिघी व पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटनांचा तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आरोपी ये-जा करत असलेल्या मार्गांवरील २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून गणेश भारत गिरी (वय २२, रा. बीड) याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याला १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७२/२०२५ अन्वये अटक करण्यात आली.
तपासात गणेश गिरी याने पिंपरी, दिघी, निगडी व चिखली पोलीस स्टेशन हद्दीत चेन चोरीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. काही गुन्हे त्याने साथीदार रोहन राजू जाधव, पंकज गणेश दिवटे, सुमित सोपान चव्हाण आणि ओमकार रामेश्वर लाटे यांच्यासोबत केल्याचे उघड झाले आहे. चिखली येथील गुन्ह्यातील आरोपी सुमित चव्हाण याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आरोपी गणेश गिरी याच्यावर यापूर्वीही बीड जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती.
ही संपूर्ण कारवाई मा. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी–अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरातील चेन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.


