शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि सुरक्षित पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने यंदाही मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सन २०१६-१७ पासून सुरू झालेला हा उपक्रम यंदा दहाव्या वर्षात प्रवेश करत असून, यावर्षी ७१ गावांतील २३६९ विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.
इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला, अजिवली, वराळे, साई, नवीन उकसान, नाणे, सोमाटणे, बेबेडओहोळ, परंदवडी, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, भोयरे, सुदुंब्रे, आढले बुद्रुक, करुंज, निगडे, देवघर, उकसान आदी ७१ गावांतील विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ आणि परीक्षा संपल्यानंतर परतीचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
१७ परीक्षा केंद्रांवर ७,६४९ विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील १७ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,६४९ विद्यार्थी बसणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोफत वाहतूक सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.
प्रवास सुविधेची गरज का?
मावळ तालुक्यातील अनेक गावे डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बससेवा मर्यादित असतात. तसेच खासगी वाहतुकीच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी हा उपक्रम सुरू केला.
विद्यार्थ्यांसाठी मानसिक आधार
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण कमी होतो. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. गेल्या नऊ वर्षांप्रमाणे यंदाही पालक आणि विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
> “विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबतच त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील.”
> — आमदार सुनील शेळके
मावळ तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आश्वासक ठरत असून, दहाव्या वर्षात पदार्पण करताना या सेवेला अधिक व्यापक प्रतिसाद मिळत आहे.


