गवळीनगर मधील 3000 स्क्वेअर फुट मध्ये होणारे जिजाऊ क्लिनिक नागरिकांसाठी वरदान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गवळीनगर प्रभागातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारे ‘जिजाऊ क्लिनिक’ उभारण्याच्या कामाला वेग आला असून हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मा. नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येत्या महिनाभरात काम पूर्ण होणार आहे.
गवळीनगरमधील स्केटिंग मैदान परिसरात सुमारे 3000 स्क्वेअर फूट जागेत हे जिजाऊ क्लिनिक उभारले जात आहे. प्रभागातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना साध्या आजारांसाठी वारंवार भोसरी येथील रुग्णालयात जावे लागत होते. मात्र, पुढील महिनाभरात हे क्लिनिक सुरू झाल्यानंतर नागरिकांना स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

थंडी, ताप, सर्दी, खोकला यांसारख्या किरकोळ आजारांवर उपचार, सलाईन लावण्याची सुविधा, गर्भवती महिलांची तपासणी तसेच लहान मुलांना विविध लसीकरण सेवा या क्लिनिकमधून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध आणि पुरुष अशा सर्व घटकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या 3000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या क्लिनिकमध्ये रुग्ण तपासणी कक्ष, ऍडमिट रूम, डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष, स्टोअररूम, टॉयलेट सुविधा तसेच बाहेर प्रशस्त व्हरांडा अशी सर्व सोयी उपलब्ध असणार आहेत.
गवळीनगर प्रभागासाठी हे जिजाऊ क्लिनिक निश्चितच वरदान ठरणार असून, स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.



