शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोषनगर–थेरगाव भुयारी मार्गावर १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेदरकारपणे तीन चाकी टेम्पो चालवून दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना घडली.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून टेम्पोचालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आशिष पुंजाराम खरात (वय ३३, व्यवसाय नोकरी, रा. कृष्णा रेसिडेन्सी, काळेवाडी, पुणे) हे कामावरून घरी जात असताना त्यांच्या मोपेड (एमएच १४ जेएन २१९५) ला भरधाव वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने धडक दिली. संबंधित टेम्पो (एमएच १४ जेपी ३२५५) चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अविचारी व निष्काळजीपणे वाहन चालवले, असे तक्रारीत नमूद आहे.
या अपघातामुळे फिर्यादी यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित टेम्पोचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.


