बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ, सिद्ध बेट चौकामध्ये १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शस्त्र बाळगून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. बंदी आदेशाचे उल्लंघन करत लोखंडी गुप्ती व महागडी दुचाकी बाळगल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ज्ञानेश्वर विठ्ठल गिरी (वय ३५, रा. गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) असे असून तो गंडाविरोधी पथकाच्या रडारवर होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वी बंदी आदेश लागू असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन केले. तपासादरम्यान त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीची लोखंडी गुप्ती तसेच अंदाजे ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. MH 14 JG 1410) जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान आरोपीसोबत असलेला रोहन अनिल दोडे (वय २०, रा. देहूफाटा, आळंदी देवाची, ता. खेड, मूळ रा. घोडपवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड) यालाही ताब्यात घेण्यात आले असून तो सध्या अटकेत आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


