शबनम न्यूज | प्रतिनिधी
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडेवस्ती, सेक्टर १० येथे जुन्या वादातून एका तरुणावर टोळक्याने लोखंडी पत्ती व लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी रघुनाथ भिमक आहेर (वय ५२, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बुद्ध विहार मागील भाग, खंडेवस्ती, सेक्टर १०, एमआयडीसी भोसरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत लोखंडी पत्तीने डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे.
हल्ल्याचा आवाज ऐकून नातेवाईक अविनाश काकडे, समाधान दुशांते व सुषमा दुशांते हे घटनास्थळी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. अविनाश काकडे यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून सुषमा दुशांते यांच्या हाताला जखम झाली आहे.
या प्रकरणी आकाश भरत खरात, सागर प्रधान, रोहन बबन गाडे, साहिल सुभाष तुपसोंदर, राहुल उर्फ काळ्या रमेश प्रसाद यांच्यासह तीन विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएस कलम १०९, १८९(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.


