शबनम न्यूज | प्रतिनिधी
कळंब – कळंब येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये 16 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता व अर्थसंकल्प 2026 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेनिमित्त महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्रीय संकल्पनेवर आधारित अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या एकूण 22 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेसाठी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवन या महाविद्यालयाचे प्रा. श्याम सातर्ले व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या महाविद्यालयाचे डॉ. गजानन कदम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी केले.
डॉ. गजानन कदम यांनी आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात आर्थिक निर्णय हे केवळ सरकार किंवा उद्योगपती घेत नाहीत, तर प्रत्येक सामान्य नागरिक दररोज घेत असतो. बचत, गुंतवणूक, कर, कर्ज, डिजिटल व्यवहार — या सर्व गोष्टींचे भान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय तसेच आर्थिक साक्षरतेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून आर्थिक साक्षरता काळाची कशी गरज आहे यासंबंधी विविध उदाहरणांसहित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. श्याम सातर्ले यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्प कशा प्रकारे मांडला जातो, अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. सध्याचा अर्थसंकल्प कशा प्रकारे मांडला गेला आहे. अर्थसंकल्प 2026 हा युवा, शिक्षण, उद्योग, शेती आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प समजून घेण्याची, त्याचे विश्लेषण करण्याची आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी एकूण 15 प्राध्यापक व 80 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. अमित शेटे यांनी केले तर आभार प्रा. योगेश खरात यांनी मानले. वक्त्यांची ओळख प्रा. सोनाली चव्हाण व अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. ज्योत्स्ना गायकवाड व प्रा. विद्या गुळीग यांनी केले.


