“दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन; महापालिका मुख्यालयात तैलचित्र लावण्याची नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांची मागणी”
प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत ठसा उमटवणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. थेरगाव परिसरात भाजप नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेविका मनीषा ताई पवार यांनी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शहराच्या पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारी त्यांची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ठाम नेतृत्वामुळे त्यांनी जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले.
याच पार्श्वभूमीवर नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी महत्त्वाची मागणी करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागावर स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी भूमिका मांडली. “महानगरपालिकेच्या इमारतीत त्यांचे चित्र लावल्यास त्यांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची प्रेरणा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि भावी पिढीला सातत्याने मिळत राहील,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या कार्यक्रमास मजू ताई गुप्ता, युवा नेते प्रमोद भाऊ पवार, दिगंबर पवार, रोहित शिवशरण, सागर वाघमारे, संभाजी अडसुळे, प्रेम पवार, श्याम केदारी आणि आकाश शेलार यांची उपस्थिती होती. उपस्थित कार्यकर्त्यांनीही ही मागणी योग्य असल्याचे मत व्यक्त करत स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कार्याला सलाम केला.


